anjir

अंजीर हे कमी पाण्यावर येणारे औषधी  फळझाड आहे. कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे बरेचशे शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देऊन अंजीर शेती कडे वळले आहेत .

महाराष्ट्रामध्ये ४१७ हेक्टर क्षेत्र हे अंजीर लागवडीखाली आहेत तर यापैकी ३१५ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे एकट्या पुणे जिल्ह्यात आहे. अंजिराचे फळ शक्तिवर्धक सौम्य रेचक, पित्तनाशक आणि रक्तशुद्धी करणारे आहे अंजिरामध्ये क, अ जीवनसत्वे तसेच लोह,पोटॅशियम, मॅग्नेशिअम यासारखे घटक असतात त्यामुळे ह्या  आरोग्यवर्धक फळाला जास्त मागणी आहे.

अंजीर लागवडीसाठी लागणारे हवामान

अंजीर लागवडीसाठी उष्ण व कोरड्या हवामानाची आवश्यकता असते. महाराष्ट्रामध्ये असे हवामान असल्यामुळे अंजीर लागवडीसाठी चांगला वाव आहे.

अंजीर लागवडीसाठी जमीन कशी असावी ?

अंजीर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या कसदार जमिनीची गरज असते. अंजीर हे फळझाड हलक्या जमिनीतही चांगले बहरते. अंजीर लागवडीसाठी जमीन जास्त खोलगट नसावी .चुनखडी असलेल्या तांबड्या मातीत अंजीर जोमाने वाढते .ओलसर दमट हवामान अंजीर वाढीसाठी घातक ठरते त्यामुळे अंजिराच्या उत्तम वाढीसाठी कमी पावसाच्या भागात तसेच कोरड्या हवामानात अंजीर चांगले येते.

लागवडीसाठी अंजिराच्या सुधारित जाती

महाराष्ट्रामध्ये मुख्यतः ऍड्रिऍटिक किंवा कॉमन हि जात लावली जाते. हि जात पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लावली जाते. पूना अंजीर या नावाने हि जात सुप्रसिद्ध आहे. अंजिराच्या अनेक जाती आहेत. व्‍हाईट सान पेट्रो,सिमरना, काबूल, कालिमिरना, कडोटा, मार्सेल्‍स ,दिनकर आदी अंजिराच्या जाती लागवडीसाठी प्रसिध्‍द आहेत.

अंजिराची वाढ हि फाटे कलमाने केली जाते.तुम्ही अंजीर लागवड करण्याआधी  खात्रीच्या बागायतदाराच्या रोगमुक्त बागेतील जोमदार वाढीची झाडे निवडून आणावी व लावावी.

अंजीर लागवड  केव्हा करावी?

अंजिराची लागवड हि पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून ते ऑगस्ट दरम्यान करावी. लागवड करण्यासाठी १५ बाय १५ फुटावर खड्डे खोदून त्यामध्ये २ ते ३ दिवस सतत पाणी टाकावे आणि त्यामध्ये अंजिराच्या रोपांची लागवड करावी . रोपाच्या चांगल्या वाढीसाठी शेणखत, पोयटा घालावे. अधिक उत्पादनासाठी तुम्ही याबरोबरच अंतरपिकेसुद्धा घेऊ शकता परंतु आंतरपिके घेताना ती कमी कालावधीची असावीत त्यांची मुळे खोल जमिनीत जाणार नाही अशी निवडावीत जेणेकरून फळबागेला अंतरपिकापासून उपद्रव होणार नाही.

खत केव्हा आणि किती प्रमाणात द्यावे?

अंजीराच्‍या झाडांची नीट व जोमाने वाढ होण्‍यासाठी लागवडीनंतर नियमित खते द्यावीत. रोपांच्या लागवडीनंतर एक वर्षापर्यंत  शेणखत व 100 ग्रॅम अमोनियम सल्‍फेट द्यावे. त्यामध्ये दरवर्षी वाढ करावी  5 वर्षे वयाच्‍या झाडांना 4 ते 5 घमेली शेण खत व 1 किलो अमोनियम सल्फेट द्यावे. 5 ते 6 वर्षे वयाच्‍या झाडास 600 ग्रॅम नत्र 250 ग्रॅम स्‍फूरद व 250 ग्रॅम पालाश दिल्‍याने फळे चांगल्‍या प्रतीची मिळतात.

सप्‍टेबर महिन्‍यात एक उथळ नांगरट करुन एक दोन आठवडे झाडांना पाण्याचा ताण द्यावा. झाडाची व्यवस्थित छाटणी करावी .शेणखत स्‍फूरद, पालाश व नत्राचा निम्‍मा हप्‍ता द्यावा.

फळांची वाढ चांगली होण्‍यासाठी नत्राचा उरलेला हप्‍ता नोव्‍हेंबर अखेर द्यावा.

पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे?

अंजीर या फळझाडाला वाढीसाठी जास्त पाण्याची गरज भासत नाही त्यामुळे मशागतीनंतर व आवश्यकतेनुसार नियमित पाणी द्यावे. जुलै व ऑगस्ट हा कालावधी झाडांच्या विश्रांतीचा असतो.झाड फळाला लागल्यावर ऑक्टोबर ते मे महिन्यामध्ये नियमित पाणी द्यावे. यामुळे फळांचा आकार वाढतो. अंजीर पिकू लागल्यानंतर पाणी देणे बंद करावे कारण जास्त पाण्यामुळे फळाचा गोडवा कमी होतो.फळांची तोडणी झाल्यानंतर झाडाला पाणी देणे बंद करावे.

बहार केव्हा येतो?

अंजीर बागेला वर्षातून दोनदा फळांचा बहार येतो. बहार धरल्‍यापासून ४ महिन्यात  फळे काढणेस तयार होतात .पावसाळ्यात येणाऱ्या म्हणजेच जुलै ऑगस्ट मध्ये येणाऱ्या बहराला  खट्टा बहार म्हणतात त्याची फळे हि बेचव असतात ज्याचा उपयोग जेली बनवण्यासाठी करता येतो.

फळांचा मिठा बहार हा मार्च एप्रिल मध्ये येतो जो खूप गोड असतो. फळांचा दर्जा चांगला असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळतो.

 चवथ्‍या वर्षापासून फळांचे उत्‍पादन घेण्‍यास सुरवात करावी. झाडे सात ते आठ वर्षाची झाल्‍यानंतर  फळांचे उत्‍पादन मोठ्या प्रमाणात येते.

झाडांची योग्य ती काळजी घेतल्यास एका झाडापासून 25 ते 40 किलो फळे मिळतात.

अंजीर लागवड

अंजीरावरील किडी व नियंत्रण

अंजीर या झाडावर तांबेरा, भुरी , तुडतुडे , कोळी कीड यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होतो.

तांबेरा हि कीड पावसाळ्यामध्ये एक प्रकारच्या बुरशीपासून तयार होतो

तांबेरा या किडीसाठी ऑक्‍टोबरच्‍या फूटव्‍यावर तसेच पानावर 3-3-50 बोर्डो मिश्रण किंवा 100 लिटर पाण्‍यात 200 ग्रॅम ब्‍लायटॉक्‍स 50 टक्‍के घालून फवारावे. बावीस्‍टीनचे 1 टक्‍का द्रावण फवारावे.

कोळी किड ही अत्‍यंत सुक्ष्‍म आकाराची किड आहे.  ही कीड पाने व फळे समुहाने कुरतडते व रस शोषून घेते त्यामुळे झाडांची पाने सुकतात. हि कीड झाडांना लागताच  100 लिटर पाण्‍यात 250 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक घालून फवारावे. असे केल्यामुळे या किडीपासून झाडांना वाचवता येते.