बायोगॅस संयंत्र

बायोगॅस म्हणजे काय?

जैविक प्रक्रियांद्वारे बाहेर पडणाऱ्या वायूला बायोगॅस असे म्हटले जाते. जर एखादी जैविक प्रक्रिया ही ऑक्सिजन विरहित वातावरणात झाली तर बायोगॅसची निर्मिती होते. बायोगॅस मध्ये ज्वलनशील वायूंचे मिश्रण असते प्रामुख्याने याच्यात कार्बन डाय-ऑक्साइड मिथेन हायड्रोजन सल्फाईड यासारख्या वायूंचा समावेश असतो . बायोगॅस मध्ये मिथेन हा वायू मोठ्या प्रमाणात तयार होतो मिथेन हा ज्वलनशील वायू आहे उत्पादना करता जनावरांच्या मलमुद्रांचा शेणाचा वापर करण्यात येतो

हवा विरहित जागेत सेंद्रिय पदार्थांचे जिवाणूद्वारे झालेले विघटन यापासून जो वायू निर्माण होतो तो ज्या साधनांमध्ये जातो त्याला बायोगॅस संयंत्र असे म्हटले जाते. बायोगॅस संयंत्रामध्ये शेण आणि इतर वनस्पतीजन्य पदार्थांना हवा विरहित जागे कुजवून बायोगॅस तयार करण्यात येतो

बायोगॅस संयंत्रांची उभारणी कोठे करावी?

 बायोगॅस संयंत्रांची उभारणी ही गोठ्याच्या जवळ उंच जागेवर करावे जेणेकरून पावसाचे पाणी याच्या भोवती जमा होणार नाही. गोठ्याच्या जवळ असल्यामुळे शेण वाहतूक करण्यास जास्त कष्ट लागत नाही. दिवसभर सूर्यप्रकाश जिथे पोहोचेल अशा जागेची निवड करावी. निवड केलेल्या जागेमध्ये झाडांच्या मुळा असू नयेत याच्यामुळे पाचक टाकीला चिरे पडू शकतात आणि संयंत्राचे नुकसान होऊ शकते. गोबर गॅस संयंत्र हे जर स्वयंपाक घराच्या जवळ असेल तर योग्य दाबाचा वायू आपल्याला मिळेल आणि गॅस वाहून नेण्यासाठी लागणाऱ्या पाईपचा खर्च हा कमी येईल. बायोगॅस संयंत्र हे उभारताना पिण्याच्या पाण्याच्या टाकी पासून दहा ते पंधरा मिटर दूर असावे. बायोगॅस वापरण्यास अत्यंत सुरक्षित  असतो, कारण तो हवेपेक्षा सातपट हलका असल्यामुळे चुकून गळती झाली तरी वातावरणात उंच निघून जातो.

बायोगॅस संयंत्रणाची प्रामुख्याने दोन प्रकारात वर्गीकरण करण्यात आलेले आहे.

तरंगते वायुपात्र असलेले (केव्हिआयसी)

 तरंगत्या टाकीचा बायोगॅस स्थिर घुमट संयंत्राच्या तुलनेने अधिक महाग आहे. अशा प्रकारच्या बायोगॅस संयंत्राची  बांधणी करताना त्यामध्ये हवाबंद, बंदिस्त पोकळी तयार करावी लागते. त्या पोकळीत सेंद्रिय पदार्थ टाकण्याची, तसेच सेंद्रिय पदार्थापासून तयार होणारा वायू व खत बाहेर येण्याची आणि साठविण्याची सोय करावी लागते.

स्थिर घुमट असलेले (जनता किंवा दीनबंधू)

स्थिर घुमट संयंत्र प्रकारचा बायोगॅस कमी खर्चात होणारा बायोगॅस प्रकल्प आहे.परंतु या प्रकारच्या बायोगॅस संयंत्राचे बांधकाम प्रशिक्षित व कसबी गवंडय़ाकडूनच करून घ्यावे .

फायबर रिएन्फोर्स्ड प्लास्टिक(एफआरपी)चे ‘रेडी टु इन्स्टॉल बायोगॅस प्लान्ट  हे देखील अलीकडच्या काळात वापरण्यात येतात. बायोगॅस संयंत्रातील पदार्थ कुजल्यानंतर त्यापासून स्लरी तयार होते. स्लरी हे उच्च प्रतीचे सेंद्रिय खत आहे. हे खत द्रवरूप किंवा वाळवून वापरता येते. ही स्लरी शेतात वापरल्यास शेतामध्ये मुरून पिकास उपयुक्त ठरते.

बायोगॅस साठी अनुदान

राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन ही योजना 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. बायोगॅस प्रकल्पाच्या उभारणीनंतर 5 वर्ष देखभाल दुरस्तीची जबाबदारी संबंधीत यंत्रणेतर्फे घेण्यात येते. सर्वसाधारण गटासाठी प्रति संयंत्र 9 हजार रुपये अनुदान देण्यात येते तसेच अनुसूचित जाती व जमाती यांसाठी प्रति संयंत्र 11 हजार रुपये अनुदान देण्यात येते. याव्यतिरिक्त शौचालय जोडणी केल्यास बाराशे रुपये प्रति संयंत्र देण्यात येते.

बायोगॅस बांधकामासाठी जर लाभार्थ्यांकडे पैसा नसेल  किंवा त्यांची त्यासाठी आर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जातो. मिळणारी अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या कर्जखाती जमा केली जाते. याशिवाय बायोगॅसचा स्वयंपाकाव्यतिरिक्त जनरेटर, रेफ्रिजरेटर यांच्या वापरासाठी वापर केल्यास इतर  प्रति संयंत्रास 5000 रुपये अनुदान देण्यात येते.

राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत योजना केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) मार्फत राबविली जाते. बायोगॅस योजनेतील अधिकच्या माहितीसाठी आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधून माहिती जाणून घेऊ शकता. बायोगॅस संयंत्राच्या अनुदान योजनेसाठी http://biogas.mnre.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकता

लहान बायोगॅस प्लांट (1 ते 25 घनमीटर) बसवण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची सुमारे 50-60 चौरस मीटर जमीन असावी.

बायोगॅस अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

ज्या जागेवर बायोगॅस उभारणार त्याचा सात-बारा

खाते उतारा

आधारकार्ड

बँक पासबुक

अर्ज