जमिनीची सुपीकता वाढावी आणि भरघोस उत्पादन व्हावे यासाठी गांडूळ खत हे अतिशय महत्त्वाचे आहे. भरघोस उत्पादनासाठी आणि शाश्वत शेतीसाठी जमिनीची सुपीकता टिकून राहणं हे अतिशय महत्त्वाचा आहे. गांडूळ हे जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्याचा महत्त्वाचं काम करत असतात.
गांडूळ खत म्हणजे काय?
वनस्पतीजन्य पदार्थ जसे की झाडांचा पालापाचोळा, जनावरांचे अवशेष या सर्व पदार्थांचा गांडूळामार्फत प्रक्रिया करून जे खत तयार होतं त्यालाच गांडूळ खत असे म्हटले जाते.
गांडूळ खत जमिनीच्या सुपीकतेसाठी फायदेशीर कसे आहे?
गांडूळ खताचा शेतीमध्ये वापर केल्यास जमिनीच्या सुपीकते बरोबरच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढत असते. जमिनीची धूप तसेच बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. बऱ्याचदा आम्लयुक्त अल्कली युक्त जमिनी होतात आणि अशा जमिनी पिकासाठी घातक असतात. या परिस्थितीमध्ये गांडूळ खताचा शेतामध्ये वापर केल्यास जमिनीचा सामू उदासीन राहून पिकाच्या वाढीसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा होतो.
पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे अन्नद्रव्य गांडूळांच्या मार्फत पिकांना उपलब्ध होतात.शेतामध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव जंतू असतात काही जीव हे फायदेशीर असतात तर काही नुकसानदायक असतात गांडूळ खताच्या वापरामुळे पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असणाऱ्या जिवाणूंची क्रियाशीलता वाढवण्याचे काम गांडूळ खतामुळे होत असते.गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरक असतात. अन्नद्रव्यांचा संतुलन अबाधित ठेवण्याचे महत्त्वाचे काम गांडूळ खताच्या वापरातून होते. इतर सेंद्रिय खतांच्या तुलनेने गांडूळ खतामध्ये असणारे मूलद्रव्य नत्र, स्फुरद, पालाश हे अधिक असते.
गांडूळांच्या प्रजाती जगामध्ये गांडुळांच्या अडीच हजारांपेक्षा जास्त प्रजाती आहेत. भारतामध्ये गांडुळांच्या 365 प्रजाती आढळून आलेले आहेत. गांडूळांच्या खाण्याच्या सवयी तसेच जमिनीमध्ये किती खोलपर्यंत ते राहतात या गोष्टींच्या अनुसार गांडूळांचे तीन गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
जमिनीच्या पृष्ठभागावर राहणारे गांडूळ
जमिनीच्या भूपृष्ठाखाली राहणारी गांडूळ
जमिनीमध्ये खोल बीळ करून राहणारी
गांडूळ खत निर्मितीसाठी जमिनीच्या पृष्ठभागावर राहणाऱ्या गांडूळांचा वापर करण्यात येतो. या प्रकारची गांडूळ ही जमिनीच्या 15 ते 20 सेंटीमीटर च्या भागावर राहतात. यापैकी आपल्या भागामध्ये खालील दोन प्रजातीचा गांडूळ खत निर्मितीसाठी वापर करण्यात येतो.
आयसेनिया फेटीडा
युड्रीलस युजेनिया
गांडूळ हे लवकर वाढणारे मोठ्या प्रमाणावर प्रजनन क्षमता असणारे असल्यास खत निर्मिती लवकर होते.
गांडूळाचे खाद्य
माती हे गांडूळ यांचे सर्वात आवडते खाद्य आहे. गांडूळ हे त्याच्या वजनाच्या दहा ते वीस पट खाद्य खात असतो.गांडुळांना झाडाचा पाला पाचोळा, झाडांचे अवशेष तसेच जनावरांचे मलमूत्र हे खाद्य म्हणून देण्यात येते.
गांडूळ खत निर्मितीसाठी जागा कशी निवडावी?
कुठल्याही प्रकारच्या गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा करताना जागेची निवड ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे जागेची निवड करताना ही जागा शक्यतो पाण्याचा निचरा होणारी, उंचावर असणारी ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही अशी असावी.गांडूळ खत प्रकल्पासाठी आपल्याला जनावरांचे मलमूत्र पालापाचोळ्या या गोष्टींची आवश्यकता असते त्यामुळे जनावरांचा गोठा शक्यतो गांडूळ खत प्रकल्पाच्या जवळपास असावा.
गांडूळ खत निर्मितीच्या पद्धती
ढीग पद्धत
सिमेंटच्या टाक्या बांधून खत निर्मिती
व्हर्मिकंपोस्ट बेड
आपल्याकडे असणाऱ्या पाण्याची उपलब्धता, भौगोलिक परिस्थिती तसेच उपलब्ध असणाऱ्या संसाधनापासून गांडूळ खत निर्मिती ही करता येते
ढीग पद्धत:-या पद्धतीमध्ये सावलीची आवश्यकता असते. शेड उभा करताना पंधरा फूट रुंद तसेच वीस फूट लांब आकाराचा उभा करावा. शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. आठ फूट उंचीवर शेडची बांधणी करावी आता या तयार झालेल्या शेडमध्ये गादीवाफे तयार करावे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये 50% शेण आणि 50% सेंद्रिय मिश्रण असावे , सहा इंचापर्यंत या मिश्रणाचा थर द्यावा. हे मिश्रण साधारणतः दोन आठवडे जुने ओलावा असणारे असावे. यानंतर याच्यावर चाळलेली मातीचा नऊ इंच उंचीचा थर द्यावा. त्यानंतर याच्यावर पंधरा ते वीस गांडूळ सोडावे आणि ढिगावर गोणपाटाचे किंवा गवताचे आच्छादन देऊन रोज पाणी फवारावे.
सिमेंटच्या टाक्या बांधून खत निर्मिती :-चार फूट रुंद आणि दहा फुटी लांब आकाराचे सिमेंटच्या टाक्या वापरून सुद्धा गांडूळ खताची निर्मिती करण्यात येते. टाक्याची उंची दोन फुटापर्यंत असावी.
वर्मी कंपोस्ट बेड :- ढीग पद्धतीनुसारच या पद्धतीने वर्मी कंपोस्ट बेड वापरून सुद्धा गांडूळ खताची निर्मिती करण्यात येते. वर दिलेल्या पद्धतीनेच या प्रकल्पाची सुरुवात करता येते त्यासाठी 40 ते 50 टक्के ओलावा टिकून राहील याची खबरदारी घ्यावी.
संपूर्ण खत तयार व्हायला साधारणता 45 दिवसाचा कालावधी लागतो.
पॅकेजिंग करून तुम्ही हे खत विकू सुद्धा शकतात फक्त पॅकिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की त्यामध्ये 35 ते 40 टक्के ओलावा असावा जेणेकरून त्या खतांमध्ये असणाऱ्या गांडू यांचे अंडी यांना वाढण्यास मदत होईल.
गांडूळ खतासाठी अनुदान योजना
गांडूळ खत उत्पादन केंद्र/शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादन
बांधकाम केलेल्या केंद्रासाठी प्रकल्पाचा मापदंड ३० फूट बाय ४८ फूट बाय २५ फूट या आकाराचे बांधकाम केलेल्या केंद्राकरिता १,००,००० रुपये या खर्चाचे मापदंडापैकी ५० टक्के अनुदान बांधकामाचे प्रमाणानुसार देण्यात येईल.
एचडीपीई गांडूळ खत केंद्र या प्रकारासाठी प्रति केंद्र एकूण ९६ चौ.फूट म्हणजे १२ फूट बाय ४४ फुट बाय २ फूट आकाराचे एचडीपीई गांडूळ केंद्रासाठी खर्चाचा मापदंड १६,००० रुपयांच्या ५० टक्के व जास्तीत जास्त ८००० रूरुपये इतके अनुदान प्रमाणानुसार देण्यात येईल.