रोपवाटिका हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. शेतीबरोबरच तुम्हाला एखादा जोडधंदा करायचा असल्यास तुम्ही रोपवाटिका व्यवसायाचा नक्कीच विचार करू शकता. बाराही महिने  चालेल असा हा व्यवसाय आहे.  शेतीबरोबरच तुम्ही हा व्यवसाय केल्यास भरगोस नफा मिळवू शकता. रोपवाटिका व्यवसाय कसा करावा याविषयी आपण जाणून घेऊयात.

रोपवाटिका म्हणजे काय?

रोपवाटिका म्हणजे जिथे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक रोपांची लागवड संगोपन आणि वाढ केली  जाते अशी जागा. यालाच नर्सरी देखील म्हणतात. फळझाडे तसेच विविध प्रकारच्या फुलांच्या जातीची लागवड करून रोपे वाढवली जातात आणि त्याची विक्री करण्यात येते.

रोपवाटिका व्यवसायाची सुरुवात कशी करावी?

कुठलाही व्यवसाय सुरु करण्याआधी महत्वाचे आहे ते व्यवसायासंबंधी योग्य नियोजन आणि त्यासंबंधित संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. सखोल माहितीसाठी जे लोक रोपवाटिका हा व्यवसाय करतात अशा ठिकाणी जाऊन भेट द्यावी व योग्य माहिती मिळवावी.  सर्वप्रथम रोपवाटिका व्यवसाय सुरु करण्याआधी शासनाकडून आपल्याला या व्यवसायासाठी परवानगी घ्यावी लागेल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात याविषयी अधिक माहिती मिळवता येते.

आपल्या भारत देशात प्रत्येक राज्यातील हवामानामध्ये कमालीचा फरक पाहण्यास मिळतो. आपल्या भागात कोणते पीक हे चांगल्या प्रकारे येते याचे सर्वप्रथम निरीक्षण करावे. जसे मराठवाडा आणि विदर्भात संत्री, मोसंबी चांगली येते, खान्देशात केळी, कोकणात सुपारी, नारळ, कोकम ,काजू यासारख्या रोपांची चांगली वाढ होते त्यामुळे त्या त्या भागात अशा रोपांची लागवड केल्यास वाहतुकीचा तसेच साठवणुकीचा खर्च देखील वाचू शकतो.

रोपवाटिकेसाठी लागणारी जागा आणि पाण्याचे नियोजन

रोपवाटिका या व्यवसायासाठी महत्वाचे आहे ते पाण्याची उपलब्धता आणि योग्य नियोजन. रोपांच्या वाढीसाठी उत्तम जागा आणि हवामानाची गरज असते. चांगल्या प्रकारची उत्तम दर्जेदार जातिवंत रोपे चांगल्या जमिनीतून निर्माण करता येतात. रोपे हे शेतात मोकळ्या जागेत तसेच ग्रीनहाऊस मध्ये लावली जाऊ शकतात. पाण्याचा मुबलक साठा असायला पाहिजे. खताचा योग्य वापर करून चांगली निरोगी रोपे वाढवली जाऊ शकतात.

रोपवाटिकेसाठी कामगार नियोजन कसे करावे?

तुम्ही जर छोट्या प्रमाणात रोपवाटिका सुरु केली असेल तर सुरुवातीला व्यवसायात जम बसेपर्यंत घरातील व्यक्तींना या मध्ये मदतीला घ्या. जसा जसा नफा वाढत जाईल तसे तुम्ही मजुरांची संख्या वाढवत नेऊ शकतात. एकदमच १० ते १२ मजूर घेतले तर तुम्ही  आर्थिक अडचणीत सापडू शकता यासाठी तुम्ही योग्य ते नियोजन करूनच सुरुवात करावी.

रोपवाटिकेची प्रकार

रोपवाटिकेची बरेच प्रकार आहे. काही रोपवाटिका ह्या हंगामी स्वरूपाच्या असतात तर काही कायमस्वरूपींच्या   चालणाऱ्या वार्षिक रोपवाटिका असतात. तुम्हाला कुठले सोईस्कर वाटते त्यानुसार तुम्ही निवडू शकता.

१)फळ झाडांची रोपवाटिका

२) फुल झाडांची रोपवाटिका

३) बी बियाणांची रोपवाटिका

४) भाजीपाल्याची रोपवाटिका

५) कलमांची रोपवाटिका

६) औषधी वनस्पतीची रोपवाटिका

७) पूर्व नोंदणी करून पुरवठा करणाऱ्या रोपवाटिका

८) मिश्र रोपवाटिका

९) हंगामी किंवा वार्षिक रोपवाटिका

तुमची शेती हि शहरालगत असेल तर तुम्ही फुलांच्या आणि भाजीपाल्याच्या रोपवाटिकेच्या उभारणीसाठी  नक्कीच विचार करावा . शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना नेहमीच निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आवड असते त्यासाठी ते आपले घर व घराबाजूचा परिसर याठिकाणी आकर्षित करणारी फुलझाडे प्रामुख्याने लावतात जेणेकरून मनाला प्रसन्न वाटेल. हल्ली सगळीकडेच जसे कि हॉस्पिटल्स, गार्डन्स, ऑफिसेस अशा वेगवेगळ्या ठिकाणी रंगीबेरंगी फुलझाडे तसेच शोभेची झाडे हि लावली जातात. हा असा व्यवसाय आहे जो वर्षातील बाराही महिने चालेल. ताजा भाजीपाला सगळ्यांनाच हवा हवासा असतो काही लोक आपल्या परसबागेतदेखील त्याची लागवड करतात. या रोपांची देखील चांगली विक्री होते.

रोपवाटिकेची मार्केटिंग कशी कराल?

कुठलाही व्यवसाय करताना त्याची योग्य पद्धतीने मार्केटिंग होणेही तितकेच महत्वाचे असते. मुख्य रस्तापासून जवळच असणारी जागा हि रोपवाटिकेसाठी निवडावी जेणेकरून ग्राहकांची गैरसोय होणार नाही. ऑनलाईन पद्धतीने तुमची वेबसाइट बनून तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून घेऊन घरपोच सेवा देखील पोहोचू शकता जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. आसपासच्या गावांमध्ये जाऊन तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या रोपांची त्यांच्या जातींची माहिती देऊन मार्केटिंग करू शकता. गुणवत्तापूर्वक आणि निरोगी रोपांना बाजारात नेहमीच किंमत असते.

तरुण शेतकरी वर्गाने पारंपरिक पिकांबरोबरच रोपवाटिका या व्यवसायाकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून बघावे व संधीचे सोने करणे आवश्यक आहे तरच शेती हि नफ्याची ठरेल.