ड्रॅगन फ्रुट ही फळ प्रजाती मूळची मेक्सिको मध्य आणि दक्षिण अमेरिका येथील उष्णकटिबंधीय वन क्षेत्रातील आहे. ऑस्ट्रेलिया,चीन, इंडोनेशिया, इसराइल, तैवान, थायलंड, श्रीलंका, चीन,या देशात ड्रॅगन फ्रुट ची लागवड होत आहे. भारतातील गुजरात, तेलंगणा या राज्यात मोठ्या प्रमाणावर लागवड होते. महाराष्ट्रामधील सातारा, सांगली, सोलापूर या भागात ड्रॅगन फळाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. कॅक्टस जातीचे फळ आहे. या फळाचा रंग बाहेरून लाल आणि आतून पांढरा असतो याच्या कटिंग पासून सुद्धा रोपी तयार होतात. श्रीमंतांचा फळ म्हणून या फळाला ओळखलं जातं. मुंबई, पुणे अशा ठिकाणी या फळाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. दुष्काळी भागात कमी पाण्यात येणार हे पीक आहे. मराठवाडा, विदर्भ यासारख्या भागात अनुकूल हवामान असल्यामुळे येथे या पिकाची लागवड करता येऊ शकते. या पिकासाठी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते नंतर उत्पन्नात वाढ होते.
ड्रॅगन फ्रुट आणि फायदे
कॅक्टस म्हणजेच निवडुंग परिवारातील हे अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे. लाल रंगाचं काटे असणार आणि आतून पांढरा किंवा गुलाबी गर असणार हे फळ आहे. हे फळ जगभरात लोकप्रिय आहे. वर्षातून सहा ते सात वेळा याची तोडणी करता येते. आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. फळांमधील असलेल्या औषधी गुणांमुळे याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ड्रॅगन फ्रुटला “सुपर फ्रुट” म्हणून ओळखले जाते.
- ड्रॅगन या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात असल्यामुळे त्वचा चिरतरुण राहते.
- कॅल्शियम, विटामिन सी हे मोठ्या प्रमाणावर आढळते.
- हृदयासाठी चांगले मानले जाते.
- शरीरातील प्रतिकार क्षमता वाढवते.
जगभरामध्ये ड्रॅगन फ्रुट पाच प्रकारचे आहेत.
Hylocereus undatus
या प्रकारची फळाची साल ही गुलाबी रंगाची असते . गराचा रंग पांढरा असतो.
Hylocereus Polyrhizus
या प्रकारच्या जातीच्या फळाची साल गुलाबी रंगाची असते. गराचा रंग लाल किंवा गुलाबी असतो. हा प्रकार जास्त प्रमाणात लावला जातो
Hylocereus megalanthus
या प्रकारच्या फळाच्या सालीचा रंग पिवळा असतो. गराचा रंग पांढरा असतो. या जातीचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते.
Hylocereus costaricensis
या जातीच्या फळांचा सालीचा रंग गुलाबी असतो. गराचा रंग गुलाबी किंवा लाल जांभळा असतो.
Hylocereus purpusii
या जातीच्या फळांच्या सालीचा रंग लाल असतो आणि गराचा सुद्धा रंग लालच असतो.
ड्रॅगन फ्रुट साठी जमीन कशी हवी?
या फळ पिकासाठी अगदी खडकाळ, मुरमाड, दगड धोंड्यांची, हलकी पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. या पिकाची लागवड तांबडी, काळी, मुरमाड, कमी खोलीची अशा विविध जमिनीमध्ये करता येते. कमी पाणी, हलकी जमीन असली तरी सुद्धा ड्रॅगन फ्रुट चांगल्या प्रकारे बहरते. मातीचा सामू 5.5 ते 6.5 हा योग्य असतो. सगळ्यात महत्त्वाचं या फळ पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. जास्त प्रमाणात पाणी साठवून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
ड्रॅगन फ्रुट साठी हवामान कसे पाहिजे
जिथे पावसाचे प्रमाण खूप आहे किंवा कमी पावसाच्या क्षेत्रामध्ये लागवड केली जाऊ शकते. सरासरी वार्षिक किमान तापमान 19 आणि कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस असणे आवश्यक आहे. या पिकाची फळधारणा व वाढ वीस ते तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत चांगल्या प्रमाणात होते. या पिकाला जास्त तापमान सहन होत नाही. उन्हाळ्यामध्ये दिवसाचे तापमान 40 ते 43 डिग्री पर्यंत पोहोचल्यावर झाडाच्या फांद्यावरती सनबर्न झाल्याचे दिसून आले आहे. सनबर्न झाल्यावर पाण्याची प्रमाण कमी करावे. बागेमध्ये सावलीचे नियोजन करावे. च्या झाडांना अन्नद्रव्य जास्त लागणार नाही आणि ज्यांची मुळे खोलवर जाणार नाहीत अशी आंतरपीके घ्यावी. भुईमूग,गवार, गुलाब, पालेभाज्या यासारखे अंतर्गत घेतली तरी चालतात. सनबर्न रोखण्यासाठी 35 ते 50 टक्के असणारी शेडनेटचा वापर करावा.
रोपे कोठे मिळणार ?
ज्या शेतकऱ्यांनी याची लागवड केली आहे त्यांच्याकडून तुम्ही रोपे घेऊ शकता किंवा कृषी विज्ञान केंद्र येथे सुद्धा रोपे उपलब्ध आहेत. रोप खरेदी करत असताना त्यावर कुठल्याही प्रकारची कीड नसावी याची काळजी घ्यावी.
ड्रॅगन फ्रुट चे रोपे कसे तयार करावे?
रोपे तयार करण्याची पद्धत म्हणजे रोप हे एक वर्षाचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या झाडाची कलम असावी. ही कलम गडद हिरव्या रंगाची असावी. वीस ते पंचवीस सेंटीमीटर लांबीची फांदी घ्यावी पण अशा फांदीची निवड करताना त्यावर कुठल्या रोगाची लक्षणे नसावीत. पॉलिथिनच्या बॅगमध्ये याची रोपे तयार करू शकतो. हे कटिंग चार ते सहा दिवस सावलीमध्ये सुकवावे असे केल्याने रोग होत नाही कटिंग लावण्यापूर्वी बुरशीनाशक द्यावे.
ड्रॅगन फ्रुटची गादी वाफ्यावर लागवड कशी करावी
अतिवृष्टी होणाऱ्या भागांमध्ये वाफ्याची साईज ही मोठी ठेवावी जेणेकरून पाणी साचून राहणार नाही. पहिल्या वर्षी उत्पादन न घेता दुसऱ्या वर्षीपासून उत्पादन घ्यावे म्हणजे झाडांची चांगली वाढ होते. गादीवाफे बनवल्यानंतर आणि पोलची उभारणी करण्याआधी बेसल डोस भरावा. प्रत्येक पोलला 15 ते 20 किलो शेणखत टाकावे. सुरुवातीच्या काळामध्ये फॉस्फरसची खूप गरज असते त्यासाठी डीएपी 150 ते 200 ग्रॅम द्यावे. जीवामृत, शेणखत, कोंबडी खत, लेंडी खत अशी ऑरगॅनिक खते वापरावी. जास्तीत जास्त ऑरगॅनिक खते वापरल्यामुळे उत्पन्नामध्ये फायदा होतो. रासायनिक खतामुळे याची मुळे जळतात रासायनिक खताचा अगदी कमीत कमी वापर करावा.
ड्रॅगन फ्रुटची लागवड केव्हा करावी?
सर्वसाधारणपणे मान्सून मध्ये या फळ पिकाची लागवड केली जाते .जुलै महिन्यात लागवड करावी. परंतु पाणी उपलब्ध असल्यास हिवाळ्यात सुद्धा लागवड करता येते. साधारणतः 18 महिन्यांमध्ये उत्पन्न मिळते. सर्वप्रथम शेत नांगरट करून घ्यावे. लागवड करताना दोन ओळींमध्ये अंतर 11 फूट असावे. दोन झाडांमधील किंवा पोल मधील अंतर आठ ते नऊ फिट असावे .
सिमेंटचा एक पोल आणि एक रिंग चार रोपे लावावे. एका फुटाच्या अंतरावर चार रोपे लावावे. पोल दोन फूट खोलपर्यंत लावावे. नवीन फुटवे खांबालगत सुतळीच्या किंवा तारेच्या सहाय्याने बांधावे.आडवे वाढणारे किंवा जमिनीच्या दिशेने वाढणारी फुटवे काढून टाकावेत. रिंग जवळ फांद्यांचा गुच्छ तयार होणार नाही याची काळजी घ्यावी. जुन्या फांद्या दोन ते तीन वर्षांनी काढून टाकाव्यात असे केल्याने नवीन फांद्या किंवा फुटवे यांना चांगल्या प्रकारे फळधारणा होत असते. फळ काढणीनंतर वार्षिक छाटणी करावी नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये छाटणी करावी. छाटणी न केल्यास फळ कमी येतात. प्रत्येक झाडाला 30 किलो फळ मिळते. हेक्टरी 20 टनापर्यंत उत्पन्न मिळू शकते.
लागवडीचा खर्च जास्त येतो साधारणतः एका हेक्टर साठी सात ते आठ लाखापर्यंत खर्च येतो परंतु फळांच्या काढणीनंतर हळूहळू नफा हा वाढत जात असतो. एकदा लागवड केल्यावर ड्रॅगन फ्रुट या रोपापासून 25 ते 30 वर्षापर्यंत उत्पादन मिळू शकते.
ड्रॅगन फ्रुट साठी पाणी व्यवस्थापन कसे करावे?
या फळ पिकामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार पाणी द्यावे. एका झाडाला दिवसाला पंधरा ते वीस लिटर पाणी द्यावे. पावसाळ्यात फुल व फळ धारणा होत असते. मध्यरात्री फुल फुलते, रात्री त्याच्यात पोलिनेशन होत असते. त्यामुळे ऋतूनुसार पावसाळ्यात खूप कमी पाणी द्यावे.
हिवाळ्यामध्ये झाडाची वाढ होत असल्याने नवीन फुटवे निघत असतात त्यामुळे पाणी योग्य वेळेत चालू ठेवणे गरजेचे असते.
उन्हाळ्यात एप्रिल ते मे या दरम्यान पाण्याचे प्रमाण कमी करावे सनबर्नचा धोका असतो उन्हाळ्यामध्ये दहा ते बारा दिवसाला पाणी द्यावे झाडांमध्ये पाणी कमी असल्यामुळे सनबर्नचा धोका कमी होतो. या पिकांना जास्त तापमान सहन होत नाही म्हणून अंतर पिके घ्यावी अशी झाडे लावावी की ज्याच्यामुळे सावली तयार होईल किंवा शेडनेटचा उपयोग करावा.
ड्रॅगन फ्रुट वरील किडीचा प्रादुर्भाव
या फळ पिकावर कुठल्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होत नाही. मावा, मुंगी, बुरशी यासारखी फक्त कीड होते. कडू लिंबाचे तेल फवारून या किडीचा नायनाट करता येतो.
ड्रॅगन फ्रुट साठी अनुदान मिळते का?
ड्रॅगन फ्रुट या पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आणि या फळाचे महत्त्व पाहून सरकारनेही अनुदान देणे सुरू केलेले आहे.
Mission for Integrated Development of Horticulture (MIDH) मधून दोन स्कीम आहेत. National Horticulture Mission(NHM) मधून हेक्टरी एक लाख 60 हजार रुपये अनुदान मिळते. MGNREGA मधून दोन लाख तीस हजार अनुदान मिळते.
फळाची लागवड करताना आपल्या भागातील तापमान, मार्केटचा अभ्यास नक्की करावा. प्रोसेसिंग मध्येही या फळांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो दुसऱ्या देशात सुद्धा याची निर्यात करता येते कृषी विद्यापीठांमध्ये याबद्दलची अधिक माहिती मिळू शकते. नागपूर, पुणे, मुंबई, गुजरात, हैदराबाद तसेच फाईव्ह स्टार हॉटेल्स या ठिकाणी या फळाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.