मधमाशी पालन हा एक शेती पूरक व्यवसाय आहे. जे शेतकरी काहीतरी वेगळे करू पाहत असतील त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मधमाशी पालन करून पहावे. आयुर्वेदामध्ये मधाला खूप अनन्य साधारण असे महत्त्व आहे म्हणूनच मधाला अमृत म्हटले जाते. सध्या बाजारामध्ये शुद्ध मधाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे त्यामुळे मधमाशी पालन हा एक फायदेशीर व्यवसाय आहे.शेतीसाठी पूरक आणि शाश्वत असा हा एक व्यवसाय आहे.
मधमाशी पुलातील मकरंद गोळा करून पोळ्यात जमा करते व त्याचे मधात रूपांतर होते .परागीभवनाचे अतिशय महत्त्वाचे काम मधमाशा या करत असतात. मधमाशांचे अस्तित्व हे मनुष्य जातीच्या अस्तित्वाशी निगडित आहे अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटलेच आहे
“If the bee disappeared off the face of the Earth, man would only have four years left to live” म्हणजेच जर का पृथ्वीतलावरून या मधमाशा नष्ट झाल्या तर मनुष्य जातही चार वर्षात संपुष्टात येईल.
काय आहे मधाचे महत्त्व?
मधाच्या सेवनामुळे अनेक प्रकारचे आजार बरे होतात. मधामध्ये “बी” जीवनसत्व असते. मध हा मधुर,शीतल असतो.
खोकला ,कफ, पित्त,क्षय यासारखे अनेक विकार मधाच्या सेवनाने दूर होतात. मधाच्या सेवनामुळे हृदयरोग रोखण्यास मदत करतो शरीरातील थकवा दूर होतो.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मधमाशी खूप मोठे काम करत असते. ज्या ठिकाणी मधमाशी पालन केले जाते तेथील आजूबाजूची शेती आणि फळबागांच्या उत्पादनात वाढ होते .मधमाशी पालन हे कुठेही करता येते अगदी शेतीच्या बांधावर किंवा छोट्या जागेतही करता येते .कमी खर्च आणि कमी वेळ हा मधमाशी पालनासाठी लागतो.
मधमाशी पालनाचे फायदे
मधमाशांचा पीक उत्पादनाच्या वाढीत 35 ते 40% इतका फायदा होतो. मधमाशा पालन करून विविध उत्पादनांची निर्मिती करता येते
मधापासून बनणारे इतर उत्पादने
मध:-मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
मेण :- विविध सौंदर्यप्रसाधनांमध्ये मेणाचा उपयोग होतो. मधमाशांच्या एका वसाहतीतून दोन किलोपर्यंत मेण निघते.
propolis:-मधमाशांच्या पोळातील प्रपोलीचा विविध औषधांमध्ये उपयोग होतो
रॉयल जेली(राजान्न):-रॉयल जेली ची बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे हा एक पौष्टिक घटक आहे तारुण्य टिकवण्यासाठी याचा वापर केला जातो. एक ग्रॅम रॉयल जेली ची किंमत हजार रुपये आहे.
बी वेनम :-बी वेनम म्हणजे मधमाशांमधील विष. जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बी वेनम विविध पेस्टिसाइडल कंपन्या विकत घेतात. एक ग्रॅम बी विनम ची किंमत जवळपास सहा ते दहा हजार रुपये इतकी आहे. अशाप्रकारे मधमाशीपालनातून लाखो रुपये कमवता येऊ शकतात.
मधमाशी पालनासाठी ज्या झाडांमध्ये मकरंद (Nector) परागकण भरपूर प्रमाणात असते अशी जागा निवडावी जसे मोहरी, जांभूळ, कराळे, तीळ, सूर्यफूल अशा पिकांमध्ये लाकडी पेट्या ठेवल्यास मधामध्ये वाढ होते.
मधमाशी पालनासाठी लागणारी यंत्रे व उपकरणे
मधुपेटी ही विशिष्ट प्रकारच्या लाकडापासून बनवलेली असते जी पावसामुळे फुगत नाही .भारतीय मानक संस्थेद्वारे प्रमाणित केलेल्याच मधुपेट्या व्यवसायासाठी निवडाव्यात. मधुपेटीचे विविध भाग असतात.
तळपाट
तळपाट हा नेहमी स्वच्छ करायचा असतो. तळपाटावर मधमाशांची विष्ठा,मेलेल्या मधमाशा ,मेन, पराग असतात.
प्रवेश द्वार
प्रवेश द्वार कामकरी माशांना पेटीच्या आत किंवा बाहेर जाण्यासाठी हे दार असते. मधुपेटी उघडताना शक्यतो या दारासमोर उभे राहू नये जेणेकरून मधमाशांना ये जा करण्यासाठी अडथळा निर्माण होईल.
ब्रुड चेंबर
ब्रुड चेंबर मध्ये फ्रेम्स या समांतर ठेवलेल्या असतात ज्या सरकवता येतात या लाकडी चौकटीमध्येच मधमाशा त्यांचे पोळ तयार करत असतात. राणीमाशीला एका चौकटीवरून दुसऱ्या चौकटीकडे जाण्यासाठी वरच्या बाजूला बी स्पेस असतो.
सुपर चेंबर
सुपर चेंबर मध्ये मधमाशा मध साठवतात.
हनी एक्सट्रॅक्टर :-पोळ्यातील मध काढण्यासाठी वापरले जाते.
मधमाशांचे प्रकार
जगभरामध्ये मधमाशांच्या वीस हजारांवर प्रजाती आहेत त्यापैकी फक्त चार प्रकारच्या प्रजाती या मध बनवतात. काही मधमाशा या उजेडात राहणं पसंत करतात तर काही मधमाशा या अंधारात राहून मधाचे पोळ बनवतात. भारतामध्ये मधमाशी पालनासाठी वापरल्या जाणाऱ्या मधमाशा खालील प्रमाणे आहेत.
एपिस डॉर्सॅटा (आगे मोहोळ)
या जातीच्या मधमाश्या या उजेडात राहणे पसंत करतात त्यामुळे या माशांना लाकडी पेट्यांमध्ये पाळता येत नाही. या माशांचा स्वभाव हा अतिशय चिडखोर असतो. या मधमाशा उंच इमारतींवर, शेतातील झाडांवर, उंच धरणावर, डोंगरांवर, बोगद्यात, वडाच्या झाडावर, दगडाच्या फटीत राहणे पसंत करतात. भारतामध्ये आढळणाऱ्या मधमाशांपैकी आकाराने सगळ्यात मोठी अशी ही मधमाशी आहे.
एपिस मेलीफेरा (युरोपियन मधमाशी )
या प्रकारच्या मधमाश्या या अंधाऱ्या जागेत पोळ करून राहणे पसंत करतात यामुळेच या मधमाश्या बंद पेटीमध्ये मधुमक्षिका पालनासाठी वापरल्या जातात. या मधमाशांपासून वर्षाला सरासरी 40 किलो पर्यंत मधाचे उत्पादन मिळू शकते. सातेरी मधमाशांपेक्षा आकाराने मोठ्या असतात. हरियाणा , पंजाब यासारख्या राज्यांमध्ये या प्रजातींचा मोठ्या प्रमाणावर मधमाशीपालनासाठी उपयोग केला जातो.
एपिस सेरेना इंडिका सातेरी मधमाशी
या मधमाशीला सातेरी मधमाशी असे म्हणतात. या प्रकारच्या मधमाश्या या आकाराने आगे मोहोळापेक्षा लहान आणि फुलोरी मधमाशांपेक्षा मोठे असतात. वर्षाला सात ते वीस किलोपर्यंत मध उत्पादन मिळते.अंधारात राहणे पसंत करतात झाडाच्या ढोलीत, दगडांच्या सांध्यात, मुंग्यांच्या वारुळात, मातीच्या ढिगार्याखाली अशा ठिकाणी या पोळ करून राहतात. अंधारामध्ये सात ते दहा पोळ एकास एक अशा समांतर बांधतात म्हणूनच त्यांना सातेरी मधमाशा असे म्हटले जाते.
एपिस फ्लोरिया (फुलोरी मधमाशी)
हिला “फुलोरी मधमाशी” असे म्हटले जाते. उजेडात राहणं पसंत करणारी ही मधमाशी आहे. हि मधमाशी छोटे पोळ करून राहते शेतातील झाडावर, बांधात किंवा झुडपांवर, काट्याच्या कुंपणात राहते. आकाराने लहान आहे उघड्या जागेत राहत असल्यामुळे कृत्रिम रित्या बंद पेटीत पाळता येत नाही.
मधमाशा ह्या वसाहतीमध्ये राहत असतात. एका वसाहतीमध्ये एक राणीमाशी, दहा ते वीस हजार काम करी माशा आणि नर माशा असतात हे सगळे मिळून त्यांचे पोळ तयार करत असतात. एका पोळा मध्ये एकच राणीमाशी असते राणीमाशी ही कामकरी माशांपेक्षा आकाराने मोठी असते दोन ते तीन वर्ष राणीमाशीचे आयुष्य असते. 500 ते 1000 अंडे राणीमाशी घालत असते. राणीमाशीचा रंग हा सोनेरी असतो .प्रत्येक राणीमाशीला वेगळा गंध असतो. राणीमाशीच्या घरात अंडी घातल्यानंतर सोळाव्या दिवशी राणीमाशीचा जन्म होतो त्यानंतर नर-माशीबरोबर तिचा संयोग होतो या संयोगा वेळी अनेक शुक्र बीज हे राणीमाशीच्या विशिष्ट पिशवीत साठवली जातात .24 तासानंतर राणी फलित आणि अफलीत अशी अंडी घालते. राणी माशीच्या सफल अंड्यातून काम करी माशा जन्माला येतात वसाहतीच तापमान स्थिर ठेवणं मध गोळा करणे हे कामकरी माशांचं काम असतं.
मधमाशी पालनाचे प्रशिक्षण कोठे कोठे दिले जाते?
राज्य शासनाच्या खादी व ग्रामोद्योग मंडळ विभागाच्या अंतर्गत मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले जाते . येथे मध हमीभावात विकत घेतला जातो तसेच साहित्यासाठी 25% अनुदान दिले जाते . राज्य शासनाच्या ऊर्जा उद्योगाद्वारे मोफत प्रशिक्षण दिले जाते.
देशातील शेतकऱ्यांची उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकार हे राज्य सरकारांच्या मदतीने विविध योजना राबवत असते .या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीशी आधारित उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज देण्यात येते मधुमक्षिका पालन योजना ही एक सरकारकडून मधमाशांच्या उद्योगासाठी राबवण्यात येते . हनी प्रोसेसिंग प्लांट साठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते या व्यवसायासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 65% टक्के रक्कम ही सरकारकडून कर्जाच्या स्वरूपात मिळते तसेच 25% सबसिडी मिळते.
ग्रीन झोन ऍग्रो कंपनी पिंपळगाव, निफाड नाशिक येथे सुद्धा मधमाशीपालनाचे प्रशिक्षण दिले जाते. मधमाशांची प्रत्यक्ष हाताळणी कशी करावी मधाची काढणी ,प्रक्रिया अशा सर्व बाबतीत प्रशिक्षण दिले जाते मधमाशी पालनाची सखोल माहिती, गट संघटन आणि मध विक्री यांबद्दल माहिती दिली जाते.
मधमाशी पालनासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अंतर्गत 25 ते 35 टक्के आणि अनुदान मिळते
मधमाशी पालनासाठी कमी खर्च आणि कमी वेळ लागतो. पर्यावरण संतुलनासाठी मधमाशी खूप मोठे काम करते .शेतीला पूरक असा हा व्यवसाय आहे म्हणूनच या व्यवसायाकडे तरुण शेतकरी बांधवांनी वळायला हवे. मधमाशी पालनातून लाखोंचा नफा तुम्ही मिळवू शकता.