हळद लागवड

हळद ही एक मसाल्यातील अशी गोष्ट आहे जी प्रत्येक स्वयंपाक घरात वापरण्यात येते. आयुर्वेदामध्ये तर हळदीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हळद ही जंतुनाशक आहे. जगभरामध्ये होणाऱ्या हळदीच्या उत्पादनापैकी तब्बल 80% हळदीचे उत्पादन हे आपल्या एकट्या भारतात होते. हळद लागवडीमध्ये हळद काढणीनंतरची प्रक्रिया ही थोडी क्लिष्ट असते म्हणून शेतकरी या पिकाकडे वळत नाही परंतु हळद शिजवणे, घोळणे यामध्ये आता चांगल्या प्रकारे यांत्रिकीकरण झालेली आहे. हळदीला चांगला भाव मिळतो म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळण्यास सुरुवात केली आहे .शेतकरी मित्रांनो हळद लागवडीतून लाखोंची उत्पादन घेऊन आपलाही आर्थिक उत्पादनाचा मार्ग सापडू शकतो यासाठी आज आपण जाणून घेऊयात हळदीचे महत्त्व, लागवड कशी करावी याबाबत सखोल माहिती.

काय आहे हळदीचे महत्व?

हळदीमुळे रक्त शुद्ध होते शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते हळदीच्या नियमित वापरल्याने त्वचेचा रंग उजळतो .हळद ही भूक वाढवणारी आहे. जखमेवर हळद लावली जाते असे केल्याने रक्तस्त्राव थांबतो. हळदीमध्ये असणाऱ्या जंतुनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासूनच आयुर्वेदामध्ये याला खूप महत्त्व आहे. सर्दी, खोकला,पोटदुखी यासारख्या आजारांवर हळदीचे दूध दिल्याने लवकर आराम पडतो. सौंदर्य प्रसाधने आणि आयुर्वेदामध्ये हळदीला महत्त्वाचे स्थान आहे.

हळद लागवडीसाठी हवामान कसे असावे?

भौगोलिक दृष्टीने हळद लागवडीसाठी संपूर्ण भारतामध्ये पोषक असे वातावरण आहे. महाराष्ट्रातील वातावरण हे हळद लागवडीसाठी अतिशय अनुकूल आहे. हळदीच्या चांगल्या वाढीसाठी स्वच्छ सूर्यप्रकाशाची तसेच उष्ण व दमट हवामान गरजेचे असते. मध्यम पाऊस पिकाच्या वाढीसाठी योग्य असतो. कोरडे तसेच थंड हवामान कंदांच्या उत्तम पोषणासाठी अनुकूल असते.

हळद लागवडीसाठी जमीन कशी निवडावी?

कुठल्याही पिकाच्या योग्य वाढीसाठी जमिनीची भौतिक, जैविक, रासायनिक गुणधर्म, जमिनीचा ph तसेच उतार या गोष्टींबद्दल सर्वात आधी माहिती करून घ्यावी. हळद लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी मध्यम प्रतीची जमीन निवडावी. जास्त पाणी धरून ठेवणारी चिकन जमिनीमध्ये पिकाची योग्य वाढ होत नाही. हलक्या माळरानाच्या जमिनीत सुद्धा हळदीचे उत्तम पीक घेता येते.

हळदीच्या जाती

फुले स्वरूप

ही हळदीची जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली आहे. हळदीची ही जात सरळ मध्यम उंच वाढणारी जात आहे पाने हिरवी असतात सहा ते सात पाने येतात फुले स्वरूप या जातीच्या पक्वतेचा काळ हा नऊ महिन्यांचा आहे. एका झाडाला दोन ते तीन फुटवे येतात हळकुंडे सरळ लांब वाढतात जवळपास 75 क्विंटल प्रति हेक्टर हळदीचे उत्पादन मिळते.

सेलम

चांगल्या कसदार जमिनीत या झाडांची उंची पाच फुटांपर्यंत वाढू शकते. यांची पाने रुंद हिरवी असतात 12 ते 15 पाने येतात. हळकुंड जाड व ठसठशीत असते. हळकुंडाचे साल पातळ असते. गाभ्याचा केशरी पिवळसर रंग असतो. या जातीच्या पक्वतेचा काळ हा आठ ते नऊ महिन्यापर्यंत असतो. एका झाडाला तीन ते चार फुले येतात.70 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

कृष्णा (कडाप्पा)

कृष्णा ही जात कसबे डिग्रज येथील हळद संशोधन केंद्रातून सण १९८४ साली कडाप्पा जातीतून निवड पद्धतीने काढण्यात आलेली आहे. या झाडांची पाने रुंद आणि सपाट असतात. दहा ते बारा पाने येतात. या जातीच्या वाळलेल्या हळदीचे 75 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

राजापुरी

या जातीचे पाने फिकट हिरव्या रंगांची रुंद व सपाट असतात. पिकाच्या वाढीच्या एकूण कालावधीमध्ये दहा ते अठरा पाने येतात. हळकुंड आखूड, जाड तसेच ठसठशीत असते. हळकुंडाची साल पातळ असून गड्यांचा रंग गर्द पिवळा असतो. या जातीच्या पक्वतेचा काळ आठ ते नऊ महिने आहे. 55 ते 57 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. राजापुरी या जातीवर ‘करपा’ नावाचा रोग पडतो. कमी उत्पादन देणारी हळकुंडाची ही जात आहे.

खाण्याची हळद (Curcuma Longa)

या जातीची पाने ही पोपटी हिरव्या रंगाच्या असतात सहा ते दहा पाने येतात. या जातीची 96% लागवड भारतात होते. ही बहुवर्षीय हळदीची जात आहे. साधारणतः 60 ते 90 सेंटीमीटर या झाडांची उंची असते. या जातीची फळे तीनदारी असतात. फुले पिवळसर आणि पांढऱ्या रंगाची असतात.

कस्तुरी/ रान हळद (Cucuma Caesia)

या जातीची लागवड आंध्र प्रदेश, कोकण तसे महाबळेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. ही वार्षिक जात असून याचे कंद मोठे गोलाकार पिवळे असते. या जातीला कापराचा वास येत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या पिकाची पाने ही वर्तुळाकार, टोकदार आणि उठावदार असतात. फुले सुवासिक असल्यामुळे औषधासाठी याचा वापर होतो.

ईस्ट इंडियन अँरोरूट (East Indian Aroroot)

या जातीची लागवड भारतामध्ये हिमालय, बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडूच्या डोंगराळ भागात व मध्य भारतात होते. या जातीच्या कंधातील स्टार्च प्रमाण 12.5% इतके आहे.

आंबेहळद (Curcuma Amada)

या जातीच्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास येत असल्याने आंबेहळद असे याचे नाव पडले आहे. या जातीची लागवड तमिळनाडू, बंगाल, कोकण या ठिकाणी केली जाते. याची पाने लांब वर्तुळाकार असतात. बोंड तीन धारी असून बहुवर्षीय जात आहे.

काळी हळद (Curcuma Caesia)

बंगालमध्ये या हळदीची लागवड करतात. याच्या कंदामध्ये सुवासिक तेल असते म्हणून या हळदीचा वापर ब्युटी प्रॉडक्ट्स मध्ये होतो.

कचोर (Curcuma Zedoria)

 कोकणामध्ये सर्वत्र या जातीची लागवड केली जाते. ही हळद वार्षिक पीक आहे तिचा उपयोग औषधाकरिता होतो.

हळद लागवडीसाठी लागणारे बियाणे

बियाणांची निवड करताना बाजारपेठेतील उच्च प्रतीची बियाणे निवडावीत. साधारणतः एक एकर शेतीसाठी दहा क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असते. लागवडीसाठी लागणारी बियाणाचे डोळे फुगलेले असावेत. तुम्ही हे बियाणे शेतकऱ्यांकडून सुद्धा घेऊ शकतात.

हळद लागवडीची पूर्वतयारी

उन्हाळ्यामध्ये जमीन पूर्ण तापल्यानंतर 15 मे ते 20 जून या दरम्यान बियाणांची लागवड करावी. त्यासाठी आधी जमिनीची उभी आडवी नांगरणी करून घ्यावी. साधारणता 22 सेंटीमीटर खोल नांगरणी करावी. चांगल्या उत्पादनासाठी रासायनिक खतांचा कमीत कमी उपयोग करावा. हळद लागवडी पूर्वी एक एकर शेतीसाठी सात ट्रॉली शेणखत हे जमिनीमध्ये पसरवून घ्यावे. जमिनीमध्ये शेणखताचा जेवढा जास्त उपयोग करणार तेवढे उत्पन्न हे चांगले मिळते. जमिनीची उभी आडवी नांगरणी केल्यावर शेणखत द्यावे रोटर मारावे व चार फूट सरी सोडाव्यात.

हळद लागवडीच्या पद्धती

हळद लागवड दोन प्रकारे करता येते ती म्हणजे सरी वरंबा पद्धत आणि रुंद वरंबा पद्धत किंवा बेड पद्धत. सरीतील उंचवट्यावर हळदीचे कंद पुरले जाते. आठ महिन्यांमध्ये हळद या पिकाला परिपक्वतात येते. या कालावधीमध्ये अंतर पिके घेता येतात. अंतर पिकांमध्ये मक्याचे पीक मात्र घेऊ नये हळदीच्या उत्पादनात याच्यामुळे घट येते दोन बियांमधील अंतर एक फूट असावे.

हळद या पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन

हळद लागवड मे ते जून मध्ये होत असल्याने सुरुवातीला पाणी चार ते सहा दिवसाला द्यावे .

पावसाळ्यामध्ये दहा ते बारा दिवसाला पाणी देऊ शकता.

पीक काढणीच्या पंधरा दिवस आधी पाणी देऊ नये.

ठिबक द्वारे पाणी दिल्याने पाण्याची योग्य नियोजन करता येते .

हळद काढणीच्या वेळी एका खड्ड्यातून हळदी सोबतच तीन ते चार बियाणे निघतात जे पुढील लागवडीसाठी वापरता येते एक सोर मिळते.

हळद ही मुळातच जंतुनाशक असल्यामुळे याच्यावर फारसा रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. जैविक खता द्वारे करपाचे नियंत्रण करता येते. हळद गोळा केल्यानंतर तिला बॉलिंग मशीन मध्ये टाकून 15 मिनिटे शिजवून घेतली जाते त्यानंतर ही शिजवलेली हळद तीन दिवस जशी आहे तशीच ठेवली जाते जेणेकरून ती मोडणार नाही. दोन ते तीन दिवसानंतर दहा ते पंधरा दिवस कपड्यावर हळद सुखायला ठेवली जाते. उन्हामध्ये हळद वाळल्यानंतर हळदीला पॉलिश करण्यात येते त्यानंतर हळद मार्केटमध्ये विकायला तयार होते. सांगलीमध्ये हळदीचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते.

 शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हळद लागवड करून तुम्ही लाखोंचा नफा मिळवू शकता. हळद काढणीच्या नंतरची प्रोसेस जरी थोडीफार त्रासदायक असली तरी आता योग्य यांत्रिकीकरण झाले असल्यामुळे फार काही कष्ट लागत नाही आणि नफाही चांगला मिळतो.