शेतकरी मित्रानो कापसासाठी लागणारे हवामान हे महाराष्ट्रामध्ये योग्य आहे त्यामुळे बहुतांश शेतकरी हे लागवडी साठी कपाशीची निवड करतात. कापूस लागवडीसाठी महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. कपाशी लागवडीसाठी कोरडे व उबदार हवामान आवश्यक असते. महाराष्ट्रातील कापूस हे महत्वाचे नगदि पीक आहे.कापूस हे पीक सहा महिने जमिनीत राहत असल्याने बियाण्यांची जमिनीची तसेच लागणाऱ्या खत औषधांची निवड चांगली करावी. जेणेकरून आपल्याला भरगोस उत्पन्न मिळेल.
जमिनीची निवड कशी करावी?
जमिनीचा PH म्हणजेच सामू हा ६ ते ८.५ च्या दरम्यान असलेली जमीन हि कापूस लागवडीसाठी योग्य असते .कापूस लागवडीसाठी मध्यम ते भारी काळ्या जमिनीची निवड करावी .पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होईल अशी जमीन निवडावी. जमिनीची खोली जास्त असावी. पाण्याचा निचरा न होणारी, पाणथळ ,मुरमाड तसेच कमी खोली असलेल्या जमिनीमध्ये कपाशीची लागवड करू नये.
कापसाच्या वाणाची निवड कशी करावी ?
शक्यतो कापसाच्या वाणची निवड करताना तुमच्या भागामध्ये कोणत्या जातीचे वाण हे चांगल्या प्रकारे येते याचा विचार करावा जसे कि मराठवाड्यामध्ये DHANDEV, MOKSHA, US ७०६७, Cotbank, MONEY MAKER, राशी NEO या कंपन्यांची वाणे हि जास्त प्रमाणात लावली जातात. खान्देशमधे SWADESHI-5, राशी ६५९, राशी ५७८, MRC ७३७३, सुपरकॉट आणि JUNGEE, MOKSHA या कंपन्यांची वाणे घेतली जातात.तर विदर्भामध्ये कीर्ती, पंगा, कबड्डी, RCH ६५९, सुपरकॉट, JUNGEE यासारख्या वाणांची निवड केली जाते.आपल्या भागातील जमिनीच्या पोतानुसार तसेच तेथील हवामानानुसार बियाणांची निवड करावी. मागील ५ ते १० वर्षांमध्ये कोणते वाण हे आपल्या भागात चांगले आलेले आहे याचा अभ्यास करूनच वाणाची निवड करावी.
कपाशीची लागवड कशी करावी?
आधीच्या पिकाची धसकटे, पाला तसेच इतर कचरा गोळा करून जाळून टाकावा व जमीन नांगरून स्वच्छ करून घ्यावी. जमिनीमध्ये शेणखत मिसळावे जमिनीची खोल नांगरणी केल्यानंतर योग्य अंतरावर वखराच्या पाळ्या घ्याव्यात सऱ्या पाडाव्यात. व्यवस्थित आरे करून घ्यावे.कपाशी लागवड करताना दोन ओळीतील अंतर ३ बाय १.५ असे ठेवावे. कपाशीची पेरणी हि योग्य वेळेतच करावी पेरणी उशिरा झाल्यास कापूस वेचणीच्या वेळेस पाऊस येऊन नुकसान होते. पिकावर किडी व रोगाचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो.
योग्य प्रमाणात शेणखत ,नत्र, स्फुरद, पालाश या खतांचा वापर करावा. योग्य त्या कीटकनाशकांची वेळोवेळी फवारणी करावी. कपाशीच्या भरगोस उत्पादनासाठी पिकाची वेळोवेळी योग्य ती काळजी घ्यावी.